202,2nd floor Administrative/Superintendent Bldg Cama and Albless Hospital, Mahapalika Marg Mumbai - 400001









नारायण नवले

प्रबंधक

प्रिय ॲक्युपंक्चर व्यवसायी बंधू आणि भगिनी, सर्वांना सस्नेह नमस्कार,

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर चिकित्सा पध्दती अधिनियम, २०१५ नुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना करुन परिषदेकडे नोंदणी झालेल्या राज्यातील ॲक्युपंक्चर व्यवसायींना अधिकृत ॲक्युपंक्चर व्यवसायी म्हणून मान्यता दिलेली आहे. पश्चिम बंगाल नंतर ॲक्युपंक्चर परिषद अस्तित्चात असणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य आहे.महाराष्ट्र राज्य तसेच ॲक्युपंक्चर व्यवसायी यांच्या दृष्टीने अत्यंत भुषणावह, अभिमानास्पद व ऐतिहासीक अशी ही घटना आहे. या ऐतिहासीक घटनेच्या अनुषंगाने प्रत्येक ॲक्यूपंक्चर व्यवसायींनी महाराष्ट्र शासनाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

या निमित्ताने परिषदेकडे नोंदणी झालेल्या सर्व ॲक्युपंक्चर व्यवसायींचे मी व्यक्तिश: व परिषदेच्या वतीने अभिनंदन करतो. महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे नोंदणीकृत असलेला ॲक्युपंक्चर व्यवसायी नोंदणी झाल्यापासुन राज्यात अधिकृतपणे ॲक्यूपंक्चर व्यवसाय करण्यास पात्र आहे. परंतु महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर चिकित्सा पध्दती अधिनियमातील तरतुदीनुसार परिषदेकडे नोंदणीकृत नसेलेले ॲक्युपंक्चर व्यवसायी यापुढे ॲक्युपंक्चर व्यवसाय करु शकणार नाहीत, याचीही सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन राज्यात लवकरच शासकीय तसेच खाजगी ॲक्युपंक्चर संस्था सुरु करण्याचा परिषदेचा मानस आहे. त्याचप्रमाणे ॲक्युपंक्चर व्यवसाय करणा-या व्यवसायींना या विषयातील आधुनिक उपचार पध्दती तसेच नव-नविन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी लवकरच परिषदेतर्फे सीएई(Continuing Acupuncture Education) सेंटर्स उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. सर्वांच्या व्यावसायीक ज्ञानाबरोबरच ॲक्युपंक्चर क्षेत्रात नव-नविन उपचार पध्दतीचा विकास व संशोधन करण्यासाठी परिषदेर्फे भविष्यात ॲक्युपंक्चर संशोधन संस्था सुरु करण्याचाही परिषदेचा मानस आहे. अर्थातच, या सर्व प्रक्रियेत आपला सर्वांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

सर्व नोंदणीकृत ॲक्युपंक्चर व्यवसायींनी अधिनियमातील तरतुदीं तसेच शासनाने निर्गमित केलेल्या महाराष्ट्र ॲक्यूपंक्चर परिषद नियम,२०१९ मधील नियमांनुसार आपला व्यवसाय सुरु ठेवावा, कुठल्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी.

धन्यवाद.
आपणा सर्वांना शुभेच्छा !

(नारायण नवले)
प्रबंधक,महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद,मुंबई